Sunday, October 11, 2009

चार पावलं

चार पावलं आपण,सोबत चालत जाऊ
तुझे आणि माझे सूर,कुठवर जुळतात पाहू

अर्थात,जमत असेल तर चल,मी आग्रह करणार नाही
'आज तरी तुला यावंच लागेल',असा हट्टही धरणार नाही

पण मनातल्या मनात कुढण्यापेक्षा,व्यक्त करणं बरं असतं
कारण इथून तिथून ऐकलेलं,सारंच काही खरं नसतं

कुणी कुणाला का आवडावं,हे सांगता येत नाही
चारचौघांना विचारून कुणी,हृदय देत नाही

तसंच काहीसं माझं झालं,त्याच धुंदीत प्रपोज केलं,
जवळ अशी कधी नव्हतीसचं...प्रपोजनं आणखी दूर नेलं

दुरावलीस हे वाईट झालं,पण झालं ते बरंच झालं
खरं सांगणं गुन्हा असतो,एवढं मात्र लक्षात आलं

जाऊ दे...झालं गेलं विसरून जा,मागे न पाहता चालत रहा
मला विसर अस मी म्हणणार नाही,पण तू तो प्रयत्न करून पहा.....

...थांब....इथून पुढे मला,एकट्यालाच जायचयं,
पण धन्यवाद,तू इथवर आलीस....

सारं आयुष्य नसलीस,तरी
चार पावलं माझी झालीस...
चार पावलं माझी झालीस......